ठाणे - मोदींना भारतीय चलनातील नोटा रद्द करण्याचा अधिकार आला कुठून, ते डाकू असून देशाचा पंतप्रधान लुटारू आहे, अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर भिवंडीतील जाहीर सभेत केली.
भिवंडी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शहरातील टावरे स्टेडियम येथे सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रकाश आंबेडकर, एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार वारिस पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होत्या. यावेळी आंबेडकर यांनी भिवंडी लोकसभा मतदार संघातील अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. भिवंडीतील पाणी प्रश्न तसेच भिवंडीतील डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी काँग्रेस-भाजपच्या खासदारांनी आतापर्यंत काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.
सभेत आंबेडकरांनी आपले भाषण मधेच थांबून उपस्थित असलेल्या नागरिकांना खिशातील १० रुपयांची नोट बाहेर काढण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानुसार एका युवकाने आपल्या खिशातील १० रुपयांची नोट काढली. त्यानंतर आंबेडकरांनी या नोटेवरचा मजकूर वाचण्यास सांगितले. या युवकाने नोटेवर भारताच्या गव्हर्नरांचा संदेश भर सभेत वाचला. " मै धारक को दस रुपया अदा करने का वचन देता हू " हा गव्हर्नरांचा संदेश भर सभेत वाचल्यानंतर त्यांनी प्रतिप्रश्न केला, की " जर गव्हर्नरांच्या सहीने नोटा चालवल्या जातात, तर मग नोटा रद्द करण्याचा अधिकार मोदींना दिला कोणी दिला? मोदी हा डाकू असून देशाचा पंतप्रधान लुटारू आहे, अशी टीका त्यांनी मोदींवर करून नोटबंदीचा समाचार घेतला.