ठाणे: बैलांच्या झुंजीवर सर्वोच्च न्यायालयाने ७ मे २०१४ रोजी बंदी घातली होती. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवून बैलांच्या झुंजींना व शर्यतींना अटीनुसार परवानगी दिली. (ban lifted on bull racing). आता कोरोनाच्या नियमांत सरकारने शिथिलता दिल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बैलांचा सराव सुरू केला आहे. (Practice of bull racing resumes)
असा केला जातो शर्तीच्या बैलांचा सराव: बैलांच्या मालकांकडून आठवड्यातून दोन वेळा शर्यतीच्या बैलांचा सराव केला जात असल्याची माहिती गांधारी गावातील बैलांचे मालक कारभारी यांनी दिली. त्यांच्या माहितीनुसार, दर तीन दिवसांनी बैलांना नदी पात्रात पोहण्याचा सराव दिला जातो. त्यानंतरच्या तीन दिवसात त्यांच्या गळ्याला सुरक्षितपणे जाड रस्सीने मागच्या बाजूने ट्रकचा टायर बांधून रस्त्यावर धावण्याचा सराव दिला जातो. तसेच दररोज नित्यनियमाने त्यांना पिठाचे गोळे आणि इतर पोषक अन्न दिले जाते. विशेषतः शर्यतीच्या नवीन बैलांना असा सराव आठ दिवसातून दोन वेळा देण्यात येत असल्याने त्या बैलांची शक्ती बळकट होऊन शर्यतीत अव्वल येण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. शिवाय या बैलांचा सांभाळ घराच्या सदस्यासारखाच केला जातो, असेही कारभारी यांनी सांगितले.
आधीच्या दाखल गुन्ह्यांचे काय? : गेल्या सात वर्षात बैलांच्या झुंजीचा व शर्यतीच्या व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होताच पोलिसांकडून विविध पोलीस ठाण्यात शेकडो आयोजकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. आता ते गुन्हेही राज्य सरकराने मागे घेण्याची मागणी जोर धरत असून यावर लवकरच राज्य सरकराने निर्णय द्यावा, अशी मागणी अनेक आयोजकांनी राज्य सरकारकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैलांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. विशेषतः कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, बदलापूर , डोंबिवली, मुरबाड, शहापूर भागात याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते.