ठाणे - ठाण्यात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेत सोशल मीडियावर वॉर सुरू झाले आहे. जाधव यांची सुटका होताच ठाण्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा सोशल मीडियावरुन आता पोस्टर्सवॉरकडे वळविलाआहे. ठाण्यात सेना आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन पोस्टारबाजी करत असल्याने आता या विषयाकडे सर्वच राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री यांच्यावर मनसैनिकांकडून टीका करण्यात येत आहे. अलिकडे मनसेनेनेही त्यांच्या टीकेला उत्तर दिले. एकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर त्याच्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही, असे म्हणणारे होर्डिंग्स लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांची ही श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर आणि त्यांना अटक झाल्यानंतर मनसैनिकांकडून पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. सोशल मीडियावर ही शाब्दिक युद्ध सुरू होते. त्यापूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसैनिकांकडून केली जात होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे राम रेपाळे यांनीही त्यांच्या टिकेला उत्तरे देत पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे, असे म्हटले होते. दोन्ही पक्षातील वाद अद्याप मिटलेला नाही हे तीन हात नाका येथे लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवरून दिसून येत आहे.
सेना-मनसे यांनी एकमेकांच्या बाजूला लावलेले होर्डिंग्स ठाणेकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भविष्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर याबाबत सेनेच्या वतीने आम्ही कधीही एकेरी शब्दात कोणावरही टीका केली नसून सेनेचे कार्य काय ते दाखवून दिले आहे, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे सेनेने काय काम केले आहे हे त्यांना पोस्टर मार्फत दाखवण्याची वेळ आली असून आमच्यावर टीका केली तर आम्ही देखील सहन करून घेणार नसल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले आहे .