नवी मुंबई - आगामी 'सरगम' या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे आणि महापौर जयंवत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, चित्रपटाचे निर्माते प्रसाद पुसावळे, एम. के. धुमाळ, अभिनेते ऋत्विक केंद्रे, संजय परदेशी अभिनेत्री दिशा परदेशी, राजलक्ष्मी यांची उपस्थिती होती.
‘सरगम’ हा चित्रपट एक किशोरवयीन मुला-मुलीची प्रेमकथा आहे. या चित्रपटात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दिवंगत लेखक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. आयुष्यात सर्व काही मिळवल्यानंतर जे राहते ते म्हणजे आयुष्य नव्हे, असा विचार करून एक व्यक्ती जंगलामध्ये निघून जाते आणि पुढचे आयुष्य तिथेच घालवते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या व्यक्तीची भूमिका कर्नाड यांनी साकारली आहे. हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट आहे.
हेही वाचा - कोरोना व्हायरस आउटब्रेक : केरळमध्ये मार्च महिन्यापर्यंत सिनेमागृह राहणार बंद
नवी मुंबईत मोठया प्रमाणात मराठी नागरिक राहत असल्याने चित्रपटाच्या पोस्टरचे नवी मुंबईमध्ये अनावरण करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. वेगळ्या धाटणीच्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट असून प्रत्येकाला नक्की आवडेल, असे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक शिव कदम हे असून निर्माते प्रसाद पुसावळे, महेंद्र केसरी, एम. के. धुमाळ हे आहेत. या चित्रपटात ऋत्विक केंद्रे, दिशा परदेशी, यतीन कार्येकर, राजलक्ष्मी, संजय परदेशी, डॉ. सुधीर निकम या कलाकारांनी काम केले आहे.