ठाणे - जिल्ह्यातील डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यत आरोग्य सेवा पोहचत नसल्याने शासनाच्या सोईसुविधा फक्त कागद रंगवुन दाखवल्या जात असल्याचे दिसून आले आहे. थंडी, तापाचे रुग्ण असो अथवा सर्पदंश, विंचुदंश, गर्भवती महिला यांना प्रथम गावठी वैदुचा ना इलाजाने आधार द्यावा लागतो. मात्र, रुग्णाची स्थिती गंभीर असेल तर रुग्णालयाशिवाय पर्याय नसतो. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचवण्याच एकमेव साधन म्हणजे चादरीची डोली करून रुग्णांची ने - आण करीत पोहचवले जाते, शासनाने मुरबाड तालुक्यात उपकेंद्रासाठी आरोग्य भरारी पथक तयार करुन वैद्यकीय अधिकारी व भाडेतत्वावर वाहन दिले. मात्र गेल्या दोन महीन्यापासून ठाणे जिल्हा परिषदेने वाहने बंद केल्याने आदिवासींना पुन्हा मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
भरारी पथक वाऱ्यावर - मुरबाड तालुक्यात धारखिंडी, वाल्हीवरे, मोधळवाडी, बांडेशेत, केळेवाडी, आल्याचीवाडी, कुंभाळा, लोत्याचीवाडी, कोंबडपाडा इत्यादी वाड्यापाड्यातील आदिवासी बांधवांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळत नाहीत. न्याहाडी येथे जिल्हा परिषद रुग्णालय आहे. मात्र, डॉक्टर नसल्याने गरोदर महिला, सर्पदंश, विंचुदंशा अथवा थंडीतापाच्या रुग्णाला चादरीची डोली करुन मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी आठ ते दहा किमीची पायपीट करावी लागत असल्याचे समोर आले आहे. शिवाय मुख्य मार्गाच्या रस्त्यावर रुग्णांना आणून वाहन तात्काळ मिळेल याचा भरवसा नसतो. मात्र नागरिकांच्या सततच्या मागणीची दखल घेऊन शासनाने धारखिंड आरोग्य केंद्रासाठी भरारी पथक निर्माण करुन तेथे एक भाडेतत्वावर वाहन उपलब्ध करुन दिले होते. परंतु हे वाहन गेल्या दोन तीन महीन्यापासून बंद केल्याने या परीसरातील आदिवासी गोरगरीब बांधवांच्या नशीबी मरणयातना आलेल्या आहेत.
दुर्गम भागातील आदिवासींना मरणयातना - शासनाने चांगल्या हेतूने खेड्यापाड्यातील गरीब बांधवांसाठी 108 क्रमांकाची आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. वातानुकूलित अँब्युलंस, दोन डॉक्टर दोन चालक, कुठुनही कॉल केला की अर्ध्या एक तासात रुग्णवाहिका येते. या योजनेचा देखील डॉक्टर व पायलट यांनी पुरता बोजवारा उडवला आहे. तालुक्यात टोकावडे, मोरोशी, मुरबाड या ठिकाणी 108 ही सेवा उपलब्ध करुन दिली असली तरी, कधी वाहन नादुरुस्त तर कधी डॉक्टरच नसतात. तर कधी वेगळीच कारणे सांगितली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे रुग्णांना एकमेव आधार असलेले भरारी पथकाचे वाहन बंद झाल्याने या दुर्गम भागातील आदिवासींना मरणयातना सोसाव्या लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आरोग्याच्या सुविधा तात्काळ मिळत नाहीत - याबाबत शिवसेना उपतालुका प्रमुख हेमंत देशमुख यांनी याविषयी आरोग्य विभागाचे लक्ष वेधले असून त्यांच्या मते तालुक्यातील मोरोशी भागात आदिवासी नागरिक दुर्गम भागात राहत आहेत. त्यांना आरोग्याच्या सुविधा तात्काळ मिळत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णावर उपचार होत नसतील तर शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या 108 या अँब्युलंसमधून त्याला उल्हासनगर अथवा कळवा येथे नेले जाते. मात्र, हे वाहन वेळेवर मिळत नसल्याने भरारी पथकाचे वाहनाचा रात्री बेरात्री उपयोग होतो. परंतु, हे भरारी पथकाचे वाहन बंद झाल्याने या भागातील नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर पडगे याच्याशी संपर्क साधला असता बंद असलेली भरारी पथकाची वाहन चार ते पाच दिवसात पुन्हा सुरु करून सेवेत आणून रुग्णांचे होणारे हाल यापुढे होणार नाही याची काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा - Maharashtra HSC 2022 Result : बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर - वर्षा गायकवाड