ठाणे - येथील दिवा परिसरातील कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बांधकामे जिल्हा प्रशासन तोडण्यासाठी आले होते. मात्र, अनेक राजकीय मंडळींनी आपली वोटबँक वाचवायला आजच्या प्रशासनाच्या कारवाईत अडसर निर्माण केला. तसेच काही राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तर घटनास्थळी ठाण मांडून अप्रत्यक्षरित्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांना बळ मिळाले.
हेही वाचा - केडीएमसीची थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू; १ हजार किलो प्लास्टिकसह ३ लाखांचा दंड वसूल
यामुळे दिव्यातील भूमाफियांविरोधात कठोर कारवाई करू, असे निवडणुकीत आश्वासन देणारेच आज कारवाई थांबवताना दिसले. २६ जुलै २००५ ला आणि नुकतेच पावसाळ्यात दिव्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दिवेकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
दिव्यात अनधिकृत बांधकामांमुळे स्थानिक भूमिपुत्र तसेच अधिकृत घरात राहणाऱ्या दिवेकरांना वीज, पाणी आणि आरोग्य सारख्या अगदी मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. मग या अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त का केले जात नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.