ठाणे : देशसेवेचे व्रत घेतलेले अनेक तरुण एनसीसीच्या माध्यमातून थलसेना, नौसेना अथवा वायुसेनेत जाण्याचा निर्धार करतात. भावी सैनिक निर्माण करण्यासाठी एनसीसी ट्रेनिंग उत्तीर्ण व्हावी लागते. परंतु ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २६ जुलै रोजी भर पावसात सुरु असलेल्या सरावा दरम्यान प्रशिक्षकाने विद्यार्थ्यांना दंडुक्याने बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी अमानुष होती की त्याचा व्हिडिओ बघून सर्वांच्या मनात संताप पसरला.
व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. दोषी युवक शुभम प्रजापती याच्या विरोधात ठाणेनगर पोलिसांनी कलम 323 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आणि यासंबंधी विचारपूस करण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी जोशी बेडेकर महाविद्यालयाला भेट देऊन प्राचार्यांशी चर्चा केली. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असतानाच सर्वच राजकीय पक्षांच्या युवा संघटनांनी या वादात उडी घेतली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी थेट प्राचार्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत दोषी प्रजापती वर गुन्हा दाखल करण्याची आणि थेट प्राचार्यांनाच निलंबित करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटाच्या युवा सैनिकांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी केली व महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालाच टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेचे गांभीर ओळखून ठाणे नगर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला होता. पोलिसांनी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालयाचे प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्यापासून मज्जाव केला दोषी प्रजापतीला अटक करण्याची मागणी करत महाविद्यालय प्रशासनाला निवेदन दिले. ठाण्यातील ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी देखील दोषी युवकावर त्वरित कारवाई करावी असे पत्र महाविद्यालय प्रशासनाला दिले.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या प्रजापती विरोधात दाखल पत्र गुन्हा नोंदवला असून त्याची चौकशी केली जाणार आहे. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणांमध्ये ठाणा कॉलेज प्रशासनाने कारवाई करत प्रजापतीला निलंबित केले असून अशा प्रकारे मारहाणीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही आणि कोणी केल्यास त्यावर कठोर कारवाई केला जाईल असा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे.
एनसीसी मारण प्रकरणी मनसेने अत्यंत आक्रमक पवित्र घेतला असून दोशी युवकाला दोन दिवसात अटक करण्याचा अल्टिमेटम महाविद्यालय प्रशासनाला दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिकांनी महाविद्यालयावर धडक दिली तेव्हाच पोलिसांनी त्यांना गेटवरच अडविले. मनसे कार्यकर्त्यांनी महाविद्यालय प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्या विद्यार्थ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
मनसेच्या शिष्टमंडळाने प्राचार्य सुचित्रा नाईक यांची भेट घेत झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारला आणि दोन दिवसात अटक न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला. या सर्व राजकीय गदारोळात जोशी बेडेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी मात्र भयभीत झाले असून स्फोटक परिस्थिती पाहता आज अनेक विद्यार्थ्यांनी घरीच राहणे पसंत केले. विद्यार्थ्यांनी आपल्याला एनसीसी मध्ये जाऊन देश सेवा करण्याची इच्छा होती परंतु घडलेल्या प्रकार बघून आता आपल्याला एनसीसी मध्ये जाण्यात रस नाही असे मनोगत व्यक्त केले.
अनेक विद्यार्थ्यांनी एनसीसी मध्ये कठोर अनुशासन असून कॅडेट्स कडून चूक झाल्यास त्यासाठी अनेकदा कठोर शिक्षा देखील केली जाते परंतु जोशी बेडेकर महाविद्यालयात घडलेला प्रकार अत्यंत क्रूर आणि अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे आपल्या मनात धडकी भरली असून याच्यापुढे एनसीसी मध्ये भरती व्हायचे नाही असे निर्णयही काही विद्यार्थ्यांनी घेतला.