नवी मुंबई - तळोजा परिसरात अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीकडे विक्री करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या तळोजा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणाऱ्या विनोदकुमार गौतमराव चौधरी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीवर मद्यविक्रीबाबत कोणतीही कारवाई न करण्यासाठी तळोजा पोलीस ठाण्याचे नाईक विनोदकुमार चौधरीने प्रती महिना 6 हजार रुपयांची लाच मागितली.
तडजोडी अंती 9 हजार रुपयात सौदा पक्का झाला. यानंतर याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीअंती तळोजा पोलीस ठाण्यातील विनोदकुमार चौधरीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौधरीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.