नवी मुंबई (ठाणे) - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दी बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून सर्व भूमिपुत्र एकवटले आहेत. 10 जूनला या भूमिपुत्रांच्या माध्यमातून साखळी आंदोलन केले गेले होते. येत्या 24 जूनला देखील नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्र या नामकरणाविषयी आंदोलन छेडणार आहेत. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही हक्कासाठी न्यायासाठी आंदोलन करणार, असा पवित्रा भूमिपुत्रांनी घेतला आहे.
24 जूनला स्थानिक भूमिपुत्र एकवटणार -
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून नवी मुंबई, पनवेल, उरणमधील सर्व भूमिपुत्र 24 जूनला एकवटणार आहेत. 10 जूनलाही साखळी आंदोलन छेडण्यात आले होते.
हेही वाचा - देवस्थान अध्यक्षपद नियुक्ती: शिर्डीतील साईबाबांचा राष्ट्रवादीला आशीर्वाद, तर काँग्रेसला पावला विठ्ठल!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तसेच 10 जूनला एकत्र जमून साखळी आंदोलन करणाऱ्यांवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून तपासणी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
परवानगी नाकारूनही एकत्र जमून आंदोलन छेडणार -
पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मात्र, तरीही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी करण्यास एकत्र जमू. कोरोनाच्या नियमांचे पालनही करू, असा पवित्रा स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांनी घेतला आहे.