ठाणे : भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाक्या लंपास करून त्या दुचाक्या जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका सराईत चोरट्याला कोनगाव पोलिसांनी मुंबई - नाशिक महामार्गावर सापळा रचून अटक केली आहे. शिवाय या चोरट्याकडून आतापर्यत पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. दीपक रवींद्र पाटील (वय, २३, रा. मालखेड ता. मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.
यामुळे करायचा दुचाक्या लंपास : मिळालेल्या माहितीनुसार, चोरटा दीपक हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मालखेड गावात राहतो. त्याला ज्या ज्या वेळी पैश्याची चणचण भासली कि, तो जळगाव जिल्ह्यातून येऊन भिवंडी तालुक्यातील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दुचाकी लंपास करून जळगावला विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यातच कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी कोनगाव पोलिसांना मोटारसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध लावून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने कोनगाव पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीप बने यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरीचा तपास करणारे सपोनि अभिजित पाटील यांना १० मार्च रोजी गुप्त माहितीच्या आधारे माहिती होती.
आरोपीकडून मोटारसायकल व रक्कम जप्त : पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि अभिजित पाटील यांच्यासह शैलेश गोल्हार, अरविंद गोरले,सरस पाटील, पोना नरेंद्र पाटील,गणेश चोरगे,पोशि रमाकांत साळुंखे या पोलीस पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपास जवळ सापळा रचून चोरट्या दिपकला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून कोनगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतून ४ तर मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून १ दुचाकी असे एकूण ५ दुचाकी चोरीचे गुन्हे तपासात उघड केले. पोलिसांनी चोरट्याकडून २ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
आरोपीला यापूर्वीही झाली होती अटक : दरम्यान, आरोपी दीपकला कोनगाव पोलिसांनी यापूर्वीही २०२२ साली एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये कारागृहातुन सुटल्यानंतर पुन्हा दुचाकी लंपास केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर चोरट्याकडे इतर गुन्ह्यांबाबत पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वी कोनगाव पोलीस ठाण्यात २ मोटारसायकल चोरीचे तर भुसावळ आणि अमळनेर पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : Satara Accident : यात्रेसाठी गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार