ठाणे - एक दोन नव्हे तर पाच गर्लफ्रेंडची हौस भागविण्यासाठी एका तरुणाने साथीदाराच्या मदतीने चक्क धूम स्टाईलने मोबाईल लुटमारी सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र दुचाकीवरून भर रस्त्यात एकाचा मोबाईल हिसकावून पळून जाताना तो सीसीटीव्हीत कैद झाला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून कोठडीचा रस्ता दाखविला. निखील ठाकरे असे पोलीस कोठडीत असलेल्या चोरट्याचे नाव असून तो भिवंडी शहरात राहणार आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात अनलॉकनंतर खून, चोऱ्या, हाणामाऱ्या, लुटमारीचे गुन्हे मोठ्या वाढवले आहे. कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात एका तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल हिसकावून धूम स्टाईल पळ काढल्याची घटना सीसीटीइव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एसीपी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी पोलीस पथक तयार करून चोरट्यांचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध लावण्यात यश आले आहे. पोलीस पथकाने भिवंडी शहरात राहणारा मोबाईल चोरटा निखील ठाकरे याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाईलदेखील हस्तगत केले आहे. अन्य मोबाईल त्याने कुठून चोरले आहे. याचा तपास सुरु आहे. तसेच, त्याच्या एका साथीदाराचादेखील शोध सुरु आहे.
गर्लफ्रेंडची हौस भागवण्यासाठी करायचा चोरी-
विशेष म्हणजे निखील याला पाच गर्लफ्रेंड आहेत. तो प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवून त्याच्याकडे खूप पैसा असल्याचे दाखवून गर्लफ्रेंडला खुश करायचा, मात्र पैश्यांची चणचण भासल्याने निखीलने मोबाईल चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी भिवंडीतून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या सोबतच महात्मा फुले चौक पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणातील दोन मोबाईल चोरटे अविनाश विठ्ठल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्यांकडूनही मोबाईल हस्तगत केले आहेत.