ठाणे : मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ सातच्या खास पथकाने शनिवारी मध्यरात्रीनंतर पाच गुन्हेगारांना नाट्यमयरित्या गुन्हेगारांच्या वस्तीतून जेरबंद केले. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या इराणी वस्तीत मुंबई पोलिसांना हवे असलेले सराईत गुन्हेगार लपले असल्याची खबर मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
४ फेब्रुवारी रोजी याच इराणी वस्तीत मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक काही गुन्हेगारांना शोधण्यासाठी आले होते. त्यावेळी गुन्हे शाखेच्या या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला पकडले होते. त्यामुळे जुन्या घरला घेऊन जातानाच पोलिसांच्या गाडीवर वडवली रेल्वे फाटकात हिंसक इराणी जमावाने जोरदार हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन पोलिसांच्या डोक्याला दुखापत झाली. ही संधी साधून हिंसक इराण्यांनी पोलिसांच्या तावडीतून त्या गुन्हेगाराला पळवून नेले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी संपूर्ण वस्तीला वेढा घालून सादिक इनायत अली जाफरी, इक्बाल मिस्की सय्यद, अली रहमत अली जाफर, सकलेन जागु इराणी आणि हैदर सय्यद अबू या 5 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवले आहे.
मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे..
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पाच गुन्हेगारावर मुंबईतील विथ पोलीस ठाण्यात चोऱ्या, घरफोड्या, सशस्त्र दरोडे, पादचाऱ्यांसाठी सोन्याचे दागिने धूम स्टाईलने पसार होण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आज पहाटेपर्यंत सुरू असलेल्या कारवाईत 5 गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. मात्र, अन्य काही संशयित गुन्हेगार अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे.