नवी मुंबई - पनवेलमधील दुंदरे गावात मंगळसूत्र चोरीला गेल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी 5 जणांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - ठाण्यात अपहरण करून लुबाडणाऱ्या आरोपींना अटक
तर या महिलेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा दावा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दूदंरे या गावातील शारदा माळी (55) यांचे सोन्याचे मंगळसूत्र शेजारी असणाऱ्या अल्पवयीन तरुणीने चोरल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर अल्पवयीन तरुणीच्या कुटुंबीयांचे आणि माळी कुटुंबीयांचे जोरदार भांडणं झाले. हा वाद विकोपाला गेला. तर ज्याने कोणी मंगळसूत्र लपवले असेल तो दुसऱ्या दिवशी मरेल, अशा शपथा गावच्या मंदिरात जाऊन अल्पवयीन तरुणी व शारदा माळी यांच्या कुटुंबातील लोकांनी घेतल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शारदा माळी या संशयास्पदरीत्या मृत अवस्थेत सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अल्पवयीन तरुणीसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा दावा केला आहे. शारदा यांना प्रथम जबर मारहाण करून, जाळण्याचा प्रयत्न करून, नंतर फासावर लटकवून खून केल्याचा आरोप माळी कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गावातून फरार झाले होते. मात्र, पोलिासांनी या आरोपींनी गावाजवळील जंगलातून अटक केली. हनुमान भगवान पाटील ( वय 37), गोपीनाथ विठ्ठल पाटील (45), अलका गोपीनाथ पाटील (35)वनाबाई अर्जुन दवणे (65) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
न्यायालयाने या चारही आरोपींना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश जाधव या अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - ठाण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या पोलिसांवरच कारवाई