ठाणे - भिवंडी शहरात नशेच्या पदार्थांची अवैध विक्री, नकली व एक्सपायरी संपलेल्या अन्न पदार्थांची विक्री तसेच वाढती गुन्हेगारी लक्षात घेता महिला सुरक्षा या विषयांबाबत तात्काळ कारवाईची मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली होती. त्यांच्या मागणीला पोलीस प्रशासनाकडून प्रतिसाद देत, आजपासून 'पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी', या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
भीती न बाळगता महिलांनी तक्रार देण्यास पुढाकार घ्यावा
ठाणे पोलीस आयुक्त यांच्यासोबत आमदार रईस शेख यांची नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शहरातील वाहतूक कोंडी, नशेच्या पदार्थांची अवैध विक्री, नकली व एक्सपायरी संपलेल्या अन्न पदार्थांची विक्री तसेच भिवंडीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता महिला सुरक्षा या विषयांबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आमदार रईस शेख यांनी केलेल्या मागणीनुसार शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील नुरीनगर पहाडी, गणेश मंदिर जवळ वार्ड क्रमांक ३ या ठिकाणी आज शांतीनगर पोलीस ठाण्याच्यावतीने 'पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी' या उपक्रमाअंतर्गत परिसरातील महिलांची बैठक घेण्यात आली. यावेळी महिलांनी आपल्या मुलांना शिक्षण देणेकरीता प्रथम प्राधान्य देण्यात यावे, महिला व मुलींवर अत्याचार होत असल्यास कोणतीही मनात भीती न बाळगता महीलांनी तक्रार देण्यास पुढाकार घ्यावा, आपले परिसरात जर कोणी महिलांची छेडछाड करीत असेल किंवा नशा करून महिलांना त्रास देत असल्यास त्याबाबत आपण महिला पोलीस अधिकारी फडतरे व जाधव यांना संपर्क करावा त्याकरिता उपस्थितांना महिला अधिकारी यांचे मोबाईल नंबर देखील देण्यात आले.
पहिल्याच उपक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद
भिवंडी परिसरातील बेकायदेशीर नशेचे पदार्थ विक्री करणारे तसेच महिलांची छेडछाड करणारे लोकांबाबत माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, याची त्यांना शाश्वती देण्यात आली. आपल्या परिसरात जर कोणी बेकायदेशीररित्या नशेचे पदार्थ विक्री करत असल्यासचे निदर्शनास आल्यास आपण तात्काळ पोलीस ठाणेशी संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले तसेच करोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी स्वतःची तसेच आपले कुटुंबीयांची काळजी घ्यावी मास्कचा सतत वापर करावा, साबणाने हात वारंवार धूवावे, सँनीटायझरचा वापर करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे या व इतर सूचना देण्यात आल्या. सदर बैठकी करिता शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह महिला सपोनि फडतरे, पोउनि जाधव व परिसरातील तब्बल ८० ते १०० महिला व पुरुष उपस्थित होते.