ठाणे : हवामानात बदल झाल्याने पहाटेची हुडहुडी थंडीतून गरम उब मिळावी म्हणून साप मोकळ्या जागेत उब घेण्यासाठी येत असल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना कल्याण मधील गणेश घाटावर आय मॅरेथॉनच्या कार्यक्रमादरम्यान घडली असून विषारी साप कार्यक्रमातील पार्किंगच्या जागेत वेटोळ्या मारून बसला ( Snake in Thane ) होता. त्यावेळी एका दुचाकी चालकाने या सापाला पाहून त्याची माहिती पोलीस हवालदाराला दिली. त्यानंतर वीस मिनटे हा विषारी साप पोलिसांच्या नजरकैदेत होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे.
विषारी साप दिसताच पोलिसांना दिली माहिती - कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ला येथे आयएमए तर्फे अर्ध मॅरेथॉनचे आयोजन आज सकळाच्या सुमारास करण्यात आले होते. या आयमेथॉनचे हे ३ रे वर्ष असून या आयमेथॉनमध्ये तब्बल तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. दुर्गाडी चौकातून प्रारंभ झालेली ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा चार विभागात आयोजित करण्यात आली होती. यासाठी हजारो स्पर्धकांचा सहभाग असल्याने पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. यापैकी वाहतूक पोलिसांचे एक पथक गणेश घाटावरील मोकळ्या जागेतील पार्किंग व्यवस्थेसाठी तैनात असतानाच, विषारी साप एका दुचाकी चालकाला दिसल्याने त्याने सापाची माहिती वाहतूक पोलीसाला दिली.
साप पोलिसांच्या नजरकैदेत - पोलिसांना माहित होताच, ते त्या विषारी सापावर सर्पमित्र येईपर्यंत नजर ठेवून होते. जर एखाद्याच्या पाय त्या सापावर पडला असता किंवा दुचाकीत हा विषारी साप शिरला असता तो साप दंश करू शकला असता. मात्र सुदैवाने पोलिसांमुळे अनर्थ टाळला. हा विषारी साप घोणस जातीचा असून ३ फूट लांबीचा आहे. या सापाला वन विभागाचे अधिकारी चन्ने यांच्या परवानगीने निसर्गाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली.