ठाणे : आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलच्या चाकात प्लास्टिकची पिशवी अडकल्याने आग लागली. आगीचा धूर पहाताच प्रवाशांनी धावत्या लोकलमधून बाहेर उड्या मारल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या कल्यान कसारा मार्गावर आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या घटनेमुळे २० मिनिट लोकल खोळंबली असल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचण्यास उशीर झाल्याचे प्रवाशांनी माहिती दिली आहे.
चाकामधून धूर : कसारा रेल्वे स्थाकानातून आज सकाळच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी अतिजलद लोकल निघाली होती. मात्र, ही लोकल आसनगाव रेल्वे स्थानकानजीक येताच लोकलच्या खालच्या बाजूला अचानक आग लागल्याचे काही प्रवाशां दिसले. प्रवाशांनी आग लागल्याची ओरडाओरड केल्याने तातडीने लोकल आसनगाव स्थानका जवळील पादचारी पुलानजीक थांबविण्यात आली. त्यावेळी लोकलच्या डब्या खालील एका चाकामधून धूर निघत असल्याचे दिसून आले. आग सौम्य स्वरुपाची असल्याने काही प्रवाशांनी तातडीने पाण्याच्या बाटल्यांमधील पाणी आगीवर ओतल्याने आग विझली.
घर्षणाने पिशवीने घेतला पेट : याबाबतची माहिती एका प्रवाशाने तात्काळ आसनगाव स्टेशन मास्तरांना दिली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुकारीकडे मोटरमन, गार्डने घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे तंत्रज्ञांनी आगीच्या जागेची पाहणी केली. त्यावेळी प्लास्टिकच्या पिशवीमुळे चाकाला आग लागल्याचे सांगण्यात आले. कदाचित ही पिशवी धावत्या लोकलच्या चाकाला अडकली असावी, यामुळे चाकाच्या घर्षणाने पिशवीने पेट घेतल्याने आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकल २० मिनिट खोळंबली : शिवाय ब्रेकच्या अति घर्षणामुळे चाकाला चिकलेल्या प्लास्टिकने पेट घेतला असावा किंवा लोकलचा ब्रेक जाम झाल्याने आग लागली असावी. असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेनंतर कल्याण कसारा मार्गावरील लोकल सेवा उशिरान धावत होती. तर, आगीमुळे लोकल आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ २० मिनिट खोळंबली होती. या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यात येत असून अद्याप नियंत्रण कक्षाला कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - Hearing On Shiv Sena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष! सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला