ठाणे - कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची लागण झाली की, रुग्ण दहशतीत येतो. हा तणाव कमी करण्यासाठी ठाण्याच्या मुंब्रा-कौसा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण धमाल मस्ती करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत कोरोनाबाधित महिला व पुरूष रुग्णांनी कोळी गीतांवर ठेका धरला आहे.
कोरोना झाल्याची भिती व आजाराच्या धास्तीचा या रुग्णांच्या चेहऱ्यावर लवलेशही दिसत नाही. रुग्णांच्या या जल्लोषाचा आनंद येथील डॉक्टर, परिचारिका आणि आयाही घेत असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित रूग्ण उपचारादरम्यान तणावात असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना तणावमुक्त करण्यासाठी रुग्णालय प्रशासन अनेक उपाय करत आहे. त्यामध्ये व्यायाम आणि डान्स थेरेपीचा समावेश आहे.