नवी मुंबई - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत? याचा आढावा घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला असता नाराजीबद्द मला माहिती नाही. पण, एका घरात मतभेद असून शकतात, असे आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर कोविडच्या काळात मुख्यमंत्री करत असलेल्या कामाला साथ देण्याची आमची जबाबदारी आहे. तसे शरद पवारांचे आदेश आहेत, असेही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. आता ते अगदी ठणठणीत असून कोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या भागात आढावा घेण्यासाठी फिरत आहेत.