ठाणे - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshiyari ) यांना आपण अतिशय जवळून ओळखत असून त्यांचे मराठी माणूस, मराठी भाषेवर अतोनात प्रेम आहे. परंतु विरोधी पक्ष त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना बदनाम करतात असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amrita Fadnavis ) यांनी म्हटले आहे.
राज्यपालाच्या बोलण्याचा विपर्यास - अमृता फडणवीस या योगगुरु बाबा रामदेव यांच्या योग शिबिरात सहभागी होण्यासाठी आज ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भगतसिंग कोशियारी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भगतसिंग कोश्यारी हे असे एकमेव राज्यपाल आहेत ज्यांचे मराठी माणूस, मराठी भाषेवर प्रेम आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मराठी शिकण्याचा चंग बांधला. परंतु मराठी बोलण्याच्या वेगात हे असं काही बोलून जातात. त्याचा विरोधी पक्ष विपर्यास करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रद्धा वालकर हत्याकांडाचा निषेध - श्रद्धा वालकर हत्याकांडावर बोलताना त्यांनी या घटनेचा तीव्र भाषेत निषेध केला. सगळे तथ्ये पडताळून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. श्रद्धा वालकरला न्याय मिळाला पाहिजे. आरोपीला अशी शिक्षा व्हावी की, त्यानंतर कोणाच असे कृत्य करायची हिम्मत होता कामा नये असेही त्या म्हणाल्या.
महिलांनी योगसाधना करावी - देशाला प्रगतिशील पासून जर प्रगत देश व्हायचे असेल तर स्त्रियांनी स्वतःला सक्षम बनवले पाहिजे. त्यासाठी त्यांनी योगसाधना करावी असं मनोगत देखील अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. आज ठाण्यात आयोजित झालेल्या बाबा रामदेव यांच्या योग शिबिरात येऊन आपल्याला अतिशय आनंद झाला असे देखील त्यांनी सांगितले.