नवी मुंबई - ऐरोली सेक्टर 16 येथील वेलकम स्वीट अँड स्नॅक्स कॉर्नर येथे चांगल्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळत असल्याने नेहमी लोकांची गर्दी येथे पाहायला मिळते. पण, येथील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची कधीही चौकशी करण्यात आली नाही. वेलकम स्वीट्स येथे, पाणीपुरी खाण्यासाठी गेलेल्या एका धाडसी महिलेने खाद्यपदार्थाचा दर्जा गलिच्छ व हानिकारक असल्याचे उघड केले.
ऐरोलीतील एक महिला पाणीपुरी खाण्यासाठी वेलकम स्वीट्स येथे गेली असता त्यांनी पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्याबाबत विचारपूस केली. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, वेलकम स्वीट अँड स्नॅक्स कॉर्नर येथे पाणीपुरी बनविण्यासाठी शौचालयातील पाणी वापरले जात आहे, तर ज्यूससाठी वापरलेली काही फळे ही पुर्णतः सडलेली होती. त्यांनी ही बाब उघड करताच जमलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. शेवटी दुकान मालकाने आपली चूक मान्य करून जनतेची जाहीर माफी मागितली आहे. याबाबत दुकानदारास फोन केला असता कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.
कोरोना काळात नियमांची होत होती पायमल्ली
कोरोना काळात वेलकम स्वीट्समध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंग पाळले जात नव्हते. कर्मचारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करत नव्हते. याबाबत अनेक तक्रारी पालिकेत नोंद आहेत. पण, तरीही कोणत्याच प्रकारची कारवाई दुकानावर करण्यात आलेली नाही.
दुकानदाराने मान्य केली चूक
दुकान मालकाने आपली चूक मान्य केली आहे. वेलकम स्वीट अँड स्नॅक्स कॉर्नरचा परवाना रद्द करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. या दुकान मालकाचे काही राजकीय नेते व पालिका अधिकाऱ्यांशी लागेबांध असल्याने कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी मनसे व भाजपचे अनेक राजकीय नेते उपस्थित होते. स्थानिक शिवाजी खोपडे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता त्यांना महापालिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडेही तक्रार देण्याबाबत सांगण्यात आले. याच नावाचे ऐरोली सेक्टर 19 मध्येही स्नॅक्स कॉर्नर आहे. तर ऐरोलीत अशा प्रकारचे बरेच मोठमोठी स्नॅक्सची दुकाने आहेत जेथे कोरोना सदृश परिस्थितीत शासनाचे नियम डोळ्यादेखत पायदळी तुडविले जातात. तसेच यांच्या खाद्यपदार्थचा दर्जा यांवर सुद्धा पाहणी करणे गरजेचे आहे.
हेही वाचा - 'सीसीटीव्ही कॅमेर्या'ला बघून घाबरु नका, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
हेही वाचा - ठाण्यात गॅस भरताना व्हॅनला आग, पेट्रोल पंपावर धावपळ