ठाणे - ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, रुग्णांना आता ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. ठाण्यातील 90 टक्के रुग्ण हे ऑक्सिजनवर असल्याने काही प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा नियमीत व्हावा यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. आयनोक्स या कंपनीद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याने, काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील ऑक्सिजनचा वापर जपून करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.
दरम्यान ठाण्यातील पार्किंग प्लझा येथे असलेल्या कोरोना रुग्णांना वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने, त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरील करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यामुळे महापालिकेने आता ऑक्सिजन पुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच रुग्णालयांमध्ये असलेला ऑक्सिजन जपून वापरण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत करार
वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन कमी पडायला नको, यासाठी महापालिकेच्या वतीने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या आयनोक्स या कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही कंपनी आजपासून 16 टन ऑक्सिजन पुरवठा करणार आहे. मात्र हा साठा देखील कमी पडणार असल्याने आणखी दोन कंपन्याकडे महापालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.
61 टन ऑक्सिजनची गरज
महापलिकेच्या ग्लोबल रुग्णालयाला दिवसाला 23 टन, तर पार्किंग प्लाझा रुग्णालयासाठी 25 टन ऑक्सिजनची गरज सध्या आहे. या दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान व्होल्टास रुग्णालय सुरू झाल्यास तीन रुग्णालय मिळून, तब्बल 61 टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे.
खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवाठा करण्याची मागणी
सद्यस्थितीत ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून, त्यांना ऑक्सिजन वेळीच उपलब्ध करुन देणे अवश्यक आहे. यासाठी प्रशासनामार्फत राज्यशासन स्तरावर संपर्क साधून ऑक्सिजनचा साठा ठाणे महापालिकेने उपलब्ध करून घेतला आहे. मात्र ठाण्यातील अनेक खासगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजनचा साठा अपुरा पडत असून, तेथील रुग्णांना वेळीच ऑक्सिाजन मिळणे गरजेचे आहे. अनेक डॉक्टरांनी ऑक्सिजनची मागणी केली आहे. त्यामुळे खसगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजनचा पुरवठा करावा असे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहे.
हेही वाचा - यंदाही भवानी मंडपाला साखरमाळेचे तोरण नाही, सलग दुसऱ्या वर्षी परंपरा खंडित