ठाणे (भाईंदर) : दलित, पीडित, गोरगरीब समाजावर होणाऱ्या अत्याचार व अन्याय विरोधात लढणारी संघटना म्हणून दलित पॅंथरची ओळख होती. आज पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या भाषणात म्हणाले की, या पन्नास वर्षांमध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या अनेक पॅंथर शहीद झाले, त्यांना आज आदरांजली वाहण्यात आली.
जुन्या आठवणीना दिला उजाळा : यावेळी पँथरच्या काळातील जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आला. त्या काळातील इतिहास, अन्याय, अत्याचाराच्या विरोधात गाव खेड्यातील दिलेला लढा हे अनेक वक्त्यांनी सांगितला. पुन्हा एकदा दलित पँथर सुरू करायची का? यावर लवकरच जेष्ठ नेते, साहित्यिक, लेखक, जुन्या नव्या पँथरची एक बैठक घेऊन ठरवण्यात येईल असे मत, आठवले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला जेष्ठ साहित्यीक, वकील, लेखक, दलित पँथरचे जुने सैनिकसह आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुन्हा दलित पँथर संघटनेची गरज : ५० वर्षांपूर्वी संपूर्ण भारतातील गावा खेड्यापाड्यात गोरगरीब, शोषित, दलित समाजावर अन्याय विरोधात वाचा फोडण्यासाठी, ९ जुलै १९७२ दलित पॅंथर या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. त्याकाळात या संघटनेने जबरदस्त वातावरण निर्माण केले. विद्रोही कवी लेखक नामदेव ढसाळ यांनी सुरुवातीला नेतृत्व केले होते. त्यानंतर संघटनेमधील राजा ढाले यांच्यामध्ये वाद झाल्याने संघटना १९७८ बरखास्त करण्यात आली. दोन गट झाल्याने संघटना संपुष्टात आली. त्यावेळी रामदास आठवले यांनी "भारतीय दलित पँथरची" स्थापना करून ही चळवळ सुरू ठेवली. शेवटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) या पक्षाच्या स्थापना झाल्यानंतर पँथर संघटनेवर दुर्लक्ष झाले. मात्र पुन्हा दलित पँथर संघटनेची गरज असल्याचे मत जेष्ठ वक्त्यांनी कार्यक्रमात मांडले.
हेही वाचा -