ठाणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणार्या नगरसेवकांचे आवाज म्यूट करुन सोयीचे ठराव पारित केले जात आहेत. ऑनलाइन महासभेच्या नावाखाली मनपात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात एकत्र येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. तसेच हा प्रकार थांबावा या मागणीसाठी त्यांनी गुरुवारी आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली.
ठाणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत नगरसेवकांचा आवाज म्युट केला जात असल्याची तक्रार अनेकवेळा नगरसेवकांकडून केली जात आहे. तसेच होणारी चर्चा आणि ठराव यांच्यात नियमितपणे तफावत आढळत असते. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण यांनी नगरसेवकांची बाजू आयुक्तांपुढे मांडली.
महापलिकेत चुकीच्या कारभाराविरोधात आतापर्यंत भाजपने आवाज उठवला होता. मात्र, आता हा अनुभव राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना आला असून आमच्यावर अन्याय होत असल्याची टीका यावेळी नगरसेवकांनी केली. तसेच यावेळी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा आयुक्तांच्या पुढे दिसून आला. दरम्यान, या सर्व प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
हेही वाचा - घर वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून
खासगी कंपनीप्रमाणे मनपाचा कारभार -
ठाणे मनपात सध्या खासगी कंपनीप्रमाणे कारभार केला जात आहे. जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणार्या नगरसेवकांचा आवाज म्यूट करणे, सोयीप्रमाणे ठराव पारीत करुन घेणे, असे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असे यावेळी विरोधी पक्षनेते शानु पठाण यांनी सांगितले.
सभागृह चालवण्याची पद्धत निंदनीय -
सन 2014पासून मनपात कायद्याने महासभा चालत नाही. ऑनलाइन सभेच्या आड भ्रष्टाचार केला जात आहे. सध्या सभागृह चालवण्याची पद्धत निंदनीय झाली आहे. तसेच होणारी चर्चा आणि ठराव यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप यावेळी जेष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी केला.
हेही वाचा - ५०० रुपयांच्या वादातून भाडेकरूची दुकान मालकाला मारहाण
...तर राज्य सरकार अडचणीत येईल -
मनपात एक विशिष्ट पक्षाच्या आदेशाने काम सुरू आहे. हुकूमशाही पद्धतीने पालिका चालत असून, काही अधिकारी प्रशासनाचे एकत आहेत. जर आम्ही भविष्यात काही निर्णय घेतला तर राज्य सरकार अडचणीत येऊ शकते, असे यावेळी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
आवडीच्या नगरसेवकांना बोलू दिले जाते -
गेल्या वर्षांपासून ऑनलाइन महासभा सुरू झाली आहे. यामध्ये चुकीच्या कारभारावर बोलले की त्या नगरसेवकांना बोलू दिले जात नाही फक्त आवडीच्या नगरसेवकांना बोलायला देतात. आतापर्यंत आम्ही बोलत होतो. मात्र, आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही अनुभव आला आहे. चुकीचे ठराव केले जातात. तसेच आयत्यावेळी चर्चा करून ठराव घुसवले जात असल्याचे यावेळी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले.
हेही वाचा - लाॅकडाऊन काळात जात पंचायती अधिक सक्रिय; मनमानी रोखण्यासाठी हेल्पलाईन