कल्याण डोंबिवली (ठाणे) - कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याची परिस्थिती याठिकाणी राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणात व्यक्त केले. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज (दि. 5 जुलै) कल्याण डोंबिवलीतील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, येत्या काळात कल्याण डोंबिवलीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ शकणार नाही. मोठ्या संख्येने हेल्थ वर्कर्सची कमतरता असून केडीएमसीच्या आताच्या व्यवस्थेत हे सगळे सांभाळणे कठीण आहे. त्यामूळे राज्य सरकारने इतर ठिकाणचे किंवा नव्याने कल्याण डोंबिवलीसाठी हे हेल्थ वर्कर्स देता येईल का याकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
कल्याण डोंबिवलीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे रुग्णांचे कोरोना अहवाल तीन दिवसांनी मिळत असल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णांची चाचणी वेगाने करावे लागणार असून आताच्या आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. तर येत्या काळात चाचण्या वाढल्यावर अती दक्षता विभागातील बेडची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसोलेशन व्यवस्था वाढवण्याची गरज भासणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, फडणवीस यांनी हॉलीक्रॉस कोविड रुग्णालयाला भेट देत त्याठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडून कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. तर 27 गावांचा राज्य सरकारने एकत्रित विचार करणे आवश्यक होते. केवळ नगरपालिका तयार करून चालणार नाही. याठिकाणी प्लॅन डेव्हलपमेंट कशी होईल याचा विचार केला नाही तर भविष्यात आपत्तीजनक स्थिती निर्माण होईल अशी भितीही त्यांनी यावेळी वर्तवली.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोना 'स्वॅब टेस्टिंग'साठी भर पावसात रांग; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा