ठाणे: मुंब्य्रातील शहानवाज मकसूद खान (23 वर्षे) हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गाजियाबादचे एक पथक मुंब्रामध्ये दाखल झाले. यानंतर मुंब्रा पोलिसांसोबत समन्वय साधत त्यांनी अखेर शहानवाजला अलिबाग येथून अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला 3 दिवसांची 'ट्रान्झिट रिमांड' सुनावली आहे.
असे करायचा धर्मांतरण: शहानवाज हा अल्पवयीन मुलांसोबत ऑनलाइन खेळ खेळायचा आणि या माध्यमातून त्यांना मुस्लिम समाजातील रुढी-परंपरांची ओळख करून द्यायचा. ते खेळामध्ये हरू नये यासाठी त्या मुलांना कुराणमधील आयत वाचायला लावायचा. शेवटच्या टप्प्यात झाकीर नाईक यांचे भाषण त्या मुलांना ऐकण्यासाठी पाठवायचा. या सर्वांच्या माध्यमातून मुलांचे 'ब्रेन वॉश' करून त्यांना मुस्लिम धर्म किती चांगला आहे याची ओळख गेमच्या माध्यमातून पटवून द्यायचा. या सर्व गोष्टी त्या मुलांना पटल्यानंतर त्यांना धर्मांतरण करण्यास सांगायचा. आरोपीने आतापर्यंत किती मुलांचे धर्मांतरण केले याचा तपास पोलीस करत आहे.
फरार असतानाही वारेमाप खर्च: शहानवाज हा फरार असताना देखील मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायचा. गाजियाबाद पोलिसांनी त्याची सर्व बँक खाती सील केलेली होती. असे असताना देखील तो पैसे कुठून खर्च करायचा, हा पोलिसांसाठी तपासाचा विषय आहे. गाजियाबाद मधल्या पेढीसाठी त्याने 20 हजार रुपये पाठवले असल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. त्यासोबत अलिबागमध्ये राहत असताना त्याचा खर्च देखील त्याने कसा केला याचा देखील पोलीस शोध घेणार आहे.
मोबाईल गेम का? मोबाईल गेममध्ये लहान मुलांना जिंकण्याचे वेड हेच धर्मांतरासाठी मुख्य कारण असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मोबाईल गेममध्ये असलेली मेसेंजरची सुविधा हेच संवादाचे मुख्य साधन बनवत शहानवाजने लहान मुलांना टार्गेट केले. सुरुवातीला आयत वाचणे, मुस्लिम धर्माचे अनुकरण करणे आणि त्यानंतर झाकीर नाईक यांची भाषणे ऐकण्यास भाग पाडणे हे शहानवाजचे नियोजन असायचे.
शेजारीही चुपचाप: शहानवाजला अटक केल्यानंतर आज गाजियाबाद पोलीस त्याला उत्तर प्रदेशला घेऊन गेले. त्याच्या कुटुंबीयांचा मात्र काही पत्ता लागू शकला नाही. त्याच्या राहत्या घराला टाळे लावून कुटुंबीय देखील घर सोडून गेलेले आहेत. यासंदर्भात शेजाऱ्यांनी कोणतीही माहिती देणे टाळले आहे.
हेही वाचा:
- Meera Road Murder: सरस्वती वैद्यच्या बहिणींना 'ते' फोटो पाहून अश्रू अनावर, कठोर शिक्षेची पोलिसांकडे केली मागणी
- Conversion Through Gaming App: ठाणे न्यायालयाकडून आरोपी शाहनवाझ खानला तीन दिवसाची ट्रान्झिट रिमांड
- Thane Crime : ठाण्यात एका गुंडाने दुसऱ्या गुंडाला चाकूने भोसकले; भर रस्त्यात खून झाल्याने दहशत