ठाणे - महापालिकेच्या भाईंदर पाडा येथील क्वारंटाईन केंद्रावर कार्यरत असलेल्या डॉक्टरला कोरोनाबाधित रुग्णाच्या नातलगाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर करीम अब्दुल कादर शेख या आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, ठाणे न्यायालयाने शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी याबाबतची माहिती दिली.
कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत, असे असतानाही डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना सुरूच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार तसेच, रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथील ठाणे महापालिकेच्या इमारतीमध्ये केंद्र कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी ठाण्यातील विविध ठिकाणचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. हे क्षेत्र प्रतिबंधीत असून इथे इतर नागरिकांना प्रवेशास मनाई आहे.
शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास येथे दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णासाठी नातेवाईक करीम शेख हा काहीतरी सामान घेऊन गेला होता. तेव्हा तेथील सुरक्षारक्षक व कर्तव्यावरील डॉक्टर सुनिल पातकर यांनी शेख याला मज्जाव केला. याचा राग मनात धरून शेख याने शिवीगाळ करीत डॉ.पातकर यांना मारहाण केली. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून, कासारवडवली पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली.