नवी मुंबई - शहरातील नवी मुंबई झोन-१ विशेष परिमंडळाचे पथकाने तब्बल आठ किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एकाला तस्कराला अटक करण्यात आली आहे.
अमली पदार्थाच्या अमलाखाली येऊन कोपरी गावात धुडगूस घालणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने नवी मुंबई विशेष परिमंडळ पथकाने कारवाई केली. 22 तारखेला विशेष परिमंडळ पथकाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना कोपरी गावात एक व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
आरोपीकडे पोलिसांना 312 ग्रॅम कॉपीस्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ मिळून आला. तसेच संबंधित व्यक्तीची अधिक चौकशी करून त्याच्या घराची झडती घेतली असता, 7 किलो 690 ग्रॅम कॉपीस्ट्रॉ सापडले, अशा प्रकारे एकूण 8 किलो ड्रग्स त्याच्याकडून जप्त करण्यात आले. त्याच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित व्यक्ती ही मूळची राजस्थान येथील असून, सद्यस्थितीत गेल्या तीन वर्षांपासून कोपरी गावात राहत आहे. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.