ठाणे : तीन मजली इमारतीचा बाहेरील स्लॅब अंगावर कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, चारजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर १ मधील बसस्थानकानजीक घडली. विष्णू पाटोळे असे जागीच मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर १ भागातील बस स्थानाकाजवळ असलेल्या तीन मजली धोकादायक इमारतीमध्ये आशा कोल्ड्रिंक नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना दुकानावर असलेला स्लॅब दुपारच्या सुमारास कोसळला. त्यावेळी मृतक विष्णू पाटोळे हा कामगार शटर दुरुस्तीचे काम करीत होता. अचानक त्याच्या अंगावर स्लॅबचा ढिगारा पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले असून अग्निशमन दलाने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे.
ही इमारत ४० वर्ष जुनी असल्याचे येथील नागरिक सांगत आहे. तर, महापालिकेला वारंवार सांगूनही कोणतीही काळजी घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, उल्हासनगरात २१ अतिधोकादायक व २१४ धोकादायक इमारती असून गेल्या पावसाळयापासून आतापर्यंत ४ ते ५ धोक्कादायक इमारती कोसळल्याच्या लहान मोठ्या घटना घडल्या आहे. मात्र, पालिका प्रशासन केवळ धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारत रिकाम्या करण्याच्या नोटीस बजावण्यापुढे काहीच कारवाई करीत नसल्याने दिसून येत आहे. तर, अशा घटना वारंवार घडत असून त्यामध्ये नाहक नागरिकांचा बळी जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.