ठाणे - भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भिवंडीतील चावींद्रा रोडवर ही घटना घडली. गणपत नारायण केणे ( वय, ६५ रा.गोरसई) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मृत गणपत केणे हे मंगळवारी दुपारी बाजारपेठेतील कामकाज उरकून घरी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या अॅक्टीव्हाला चावींद्रा येथील मॉडर्न बॅटरी कंपनीसमोर भरधाव वेगातील स्कॉर्पिओने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत गणपत केणे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.