ठाणे - भिवंडीत ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ आज तालुक्यातील पडघा-बोरिवली गावातील एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटना पाहता कोरोना विषाणूचा शिरकाव आता भिवंडी शहरासह ग्रामीण भागातही झाला आहे.
पडघा-बोरिवली गावात आज आढळून आलेली वृद्ध महिला कर्करोगग्रस्त आहे. या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तिची तपासणी केली असता तिला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महिलेला ठाणे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच या महिलेच्या कुटुंबातील चार सदस्यांना क्वारंटाईन करून मुंबई-नाशिक मार्गावरील राजाणोली येथील टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन केंदात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ही महिला राहत असलेल्या बोरिवली गावातील तीन किलोमीटरचा परिसर सील करून या परिसरात राहणाऱ्यांना नागरिकांची तपासणी सुरू केल्याची माहिती भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी घोडपडे यांनी दिली आहे.