ठाणे - अल्पवयीन मुलीवर अत्याचारांची घटना ताजी असतानाच त्याच डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत एका 13 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडवत मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे. अक्षय तुकाराम महाडिक (21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपीला ठाण्यातून अटक
सोमवारी 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास विष्णूनगर पोलीस ठाण्यात कलम 363, 354 सह लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याचे सन 2012 चे कलम 12 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका 13 वर्षीय मुलीला फूस लावून तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होताच डोंबिवली पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडवून आणले. खासगी गुप्तहेरांच्या साह्याने अक्षय महाडिक याला ठाण्यातून अटक करण्यात आली.
पीडित मुलीला चार दिवस ठेवले घरात कोंडून
आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने या मुलीला भिवंडीतील एका घरात कोंडून ठेवल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी भिवंडीतील काल्हेर गावातल्या तेजस्विनी आर्केड इमारतीतल्या आरोपीच्या फ्लॅटमध्ये कोंडलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलीला तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आल्याचे पंढरीनाथ भालेराव या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील 13 वर्षीय तक्रारदार मुलीशी आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातून या मुलीशी जवळीक साधल्यानंतर आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. आरोपी अक्षय महाडिक हा सीसीटीव्ही सिस्टीम, कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असल्याने तो सोशल मिडिया माध्यमांमध्येही तरबेज आहे. त्यामुळेच त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीशी जवळीक साधली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - VIDEO : अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, वाहने अडवून पादचाऱ्यांना शिवीगाळ