ठाणे - जय श्री राम बोलण्यावरून मारहाणीचे सत्र काही केल्या संपत नाहीत. झारखंडमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला मारहाण करण्यात आली होती. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बळजबरी करणाऱ्या घटनांचे सत्र सुरूच होते. आता पुन्हा एकदा असा, प्रकार एका युवकसोबत दिवा येथे घडला आहे.
मुंब्रा येथील कौसा भागात एका मुस्लीम तरूणाला तीन जणांनी 'जय श्री राम', अशी घोषणा देण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरूणाने दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात मंगेश मुंढे (वय - ३० वर्षे), अनिल सुर्यवंशी (वय - २२ वर्षे) आणि जयदीप मुंढे (वय - २६ वर्षे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना बुधवारी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. झारखंड येथे एका तरूणाला जय श्री राम बोलण्यावरून मारहाण केल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही. तोच हा प्रकार समोर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
कौसा येथील तन्वरनगर परिसरात राहणारा फैसल खान (वय - २५ वर्षे) हा रविवारी त्यांच्या ओला कारने दिवा येथील आगासन रोड परिसरात प्रवासी घेण्यासाठी जात होते. त्यावेळी त्याची कार रस्त्यामध्ये बंद पडली. याच मार्गावरून मंगेश, अनिल आणि जयदीप हे तिघेही एका दुचाकीने जात होते. त्यावेळी मंगेशने फैसलला शिवीगाळ करत रस्त्यावर गाडी का उभी केली ,असा जाब विचारला. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीत मंगेश, अनिल आणि जयदीप या तिघांनी त्यांना मारहाण केली. त्यावेळी फैसल यांनी 'अल्ला के वास्ते मुझे मत मारो, मुझे छोड दो...' असे म्हणत विनंती केली. त्यावेळी पुन्हा या तिघांनी फैसलला शिवीगाळ करत 'तु मुसलमान है, जय श्री राम बोल' असे धमकावले. त्यानंतर फैसलचा मोबाईल घेऊन तिघांनी पळ काढला. फैसल घरी आल्यानंतर त्यांने सोमवारी याप्रकरणी तिघांविरोधात केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटकही केली होती. मात्र, सुरूवातीच्या तक्रारीत त्याने जय श्री राम म्हणत धमकावल्याचा उल्लेख केला नव्हता. घरी आल्यानंतर त्याने घरच्यांना ही माहिती दिल्यानंतर याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.