ठाणे - कोरोनाचा वाढता धोका पाहता सध्या सोशल डिस्टनसिंग हा त्यावरील एकमेव उपाय आहे. जांभळी नाका येथील घाऊक भाजी आणि किराणा मार्केटमध्ये मात्र या सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.
येथील घाऊक भाजी मार्केट शहरातील चार ते पाच भागात स्थलांतरित केल्याने त्या समस्येवर फारशी चिंता करण्याचे कारण नाही. परंतु, घाऊक किराणा बाजारात मात्र लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सोशल डिस्टनसिंग झुगारून देत ग्राहकांनी अनेक किराणा दुकानांसमोर गर्दी केली होती. कोपरी नौपाडा प्रभागाचे सहआयुक्त मारुती गायकवाड आणि त्यांच्या पथकाने परिसरात फिरून सोशल डिस्टनसिंगचे महत्व सगळ्यांना सांगितले. सरकारी आदेशाचे पालन न करणाऱ्या अनेक दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या. नागरिक विनाकारण बाहेर पडणे थांबवत नाहीत तोपर्यंत कडक कायदे अंमलात आणू, असे त्यांनी सांगितले.