ठाणे - महापालिकेत गेल्या काही वर्षात नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची लगबग सुरू असते. नालेसफाई योग्य झाली असल्याचे दावे पालिकेच्या वतीने करण्यात येतात. काल रात्री झालेल्या पहिल्याच पावासात शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. बहुतांशी नाल्यात कचरा जैसे थे असल्याने नाले तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आले तर काही ठिकाणी घराघरात पाणी शिरले. त्यामुळे नालेसफाईसाठी केलेला ९ कोटी रुपयांचा खर्च पहिल्याच पावसात वाहून गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेला असल्याने तत्काळ नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जैसवाल यांनी दिले होते. विशेष म्हणजे वेळेत नालेसफाई व्हावी, यासाठी यंदा प्रत्येक प्रभाग समितीनिहाय टेंडर काढून जादा ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर नालेसफाईचे काम करण्यात येत असून नाल्यातील कचरा काढण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता. दुसरीकडे जो मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात येत आहे तो काही ठिकाणी तत्काळ उचलण्यात येत नसल्याने तो कचरा पुन्हा नाल्यात वाहून जातो. पहिल्याच पावसात तीच परिस्थिती पुन्हा एकदा दिसून आली. काम वाटप करताना नगरसेवकांशी आणि पालिका अधिकाऱ्यांशी हितसबंध जपणार्या कंत्राटदारालाच कामाचे वाटप होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यापुर्वी कामासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येत असले तरी नाल्यांची सफाई कधीच पूर्ण केली जात नाही, वरवरची केली जाते आणि नालेसफाई झाली असल्याचे दाखवून बीले पास केली जातात. विशेष म्हणजे नालेसफाई किती झाली हे मोजण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्यामुळे याचा फायदा अधिकारी आणि ठेकेदार घेताना दिसत आहेत. अशा प्रकारे संगनमताने पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कालरात्री झालेल्या पहिल्या पावसात आंबेडकर रोड, कोरम मॉल कडील नाला, संभाजी नगर या परिसरातील नाले तुडुंब भरून वहात होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रमुख रस्त्यावर पाणी साचले होते. बहुतांशी गटार भरून वाहत असल्याने ते पाणीही रस्त्यावर आले होते तर संभाजी नगर, नौपाडा येथील चिखलवाडी परिसरात ६० ते ७० घरात पाणी शिरले होते. महापालिका मुख्यालयाच्या समोरील रस्ता, खाऊगल्ली परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पहिल्याच पावसात शहराची अवस्था भयावह झाल्याचे दिसत होते. वंदना सिनेमा परिसर, वागळे, वर्तकनगर, मुंब्रा, कळवा या परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
काही वर्षांपूर्वी मुंबईत नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत उघड झाले असल्याने अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे याच धर्तीवर ठाण्यातील नालेसफाईच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता तेच ते ठेकेदार सिंडिकेट करून कामे घेतात. ठेकेदारांच्या कंपन्यांमधे मुळ प्रवर्तक कोण, भागिदार कोण, कुणाचे नातेवाईक आहेत याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. नालासफाईच्या अंदाजित खर्चातही मोठा भ्रष्टाचार असतो. गेल्या चार वर्षात बहुतांशी निविदा ३० ते ३५ टक्के कमी दराने आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या कमी दरात काम करणे कसे परवडते हा प्रश्नही निर्माण झाला आहे.