ठाणे - राज्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपार्यंत संचारबंदीचे आदेश जारी केल्यानंतर, मंगळवारी ठाणे पोलिसांनीही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांकडून शहरातील प्रत्येक नाक्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. या संचारबंदीमधून वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
२२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात कडक संचारबंदी असणार आहे. याकाळात केवळ वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच रस्त्यावर फीरता येणार आहे. इतर व्यक्ती रस्त्यावर फीरताना आढळून आल्यास कडक कारवाई करू असा इशारा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. तसेच रात्री 11 ते सकाळी 6 या काळामध्ये सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यास देखील मनाई असणार आहे. हा आदेश ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागांना लागू असणार आहे.
हॉटेल, ढाबे राहणार बंद
ठाणे पोलिसांनी २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केल्याने आणि कारवाईचा इशारा दिल्याने, ठाण्यातील नववर्षाच्या जल्लोषाला बेक्र लागणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने येऊर हिल परिसरातील हॉलेट आणि बंगल्यांवर तरुणाई गर्दी करत असते, मोठमोठाल्या पार्ट्यांचे आयोजन या ठिकाणी होत असते मात्र आता संचारबंदी लागू असल्याने हे सर्व हॉटेल व ढाबे बंद राहाणार आहेत. या सर्व ठिकाणांवर पोलिसांची नजर असणार आहे. त्यामुळे यंदा नववर्षाचा जल्लोष ठाणेकरांना आपल्या घरीच साजरा करावा लागणार आहे.