ठाणे - लोकल मोटरमनच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करणाऱ्या एका वृद्धाचा जीव वाचला आहे. ही घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्या वृद्धाची समजूत काढून त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. दीनदयाल भानुशली (७९ वर्षे) असे जीव वाचलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील काटेमानिवली ब्रीजजवळ असलेल्या राई एन्क्लेव्ह या इमारतीमध्ये कुटुंबासह राहतात.
लोकल रेल्वे थांबली अन् ...
४ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास फलाट क्र. २ वर दिनदयाल भानुशली हे एका लोकल समोर येत असल्याचे मोटरमनला दिसले. ते आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर येत असल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. त्यामुळे मोटरमननेही सावधानता दाखवून रेल्वे थांबवली. यामुळे दीनदयाल भानुशली यांचा जीव वाचला.
वृद्धाच्या मुलाने मानले मोटरमन व लोहमार्ग पोलिसांचे आभार
लोहमार्ग पोलीस कर्मचारी व्हरकट आणि गोंधळे हे यावेळी विठ्ठलवाडी स्थानकात गस्तीवर होते. यावेळी मोटरमनने पोलिसांना याची माहिती दिली. तसेच दीनदयाल यांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. लोहमार्ग पोलिसांनी दीनदयाल यांची विचारपूस व चौकशी केली. त्यांच्या मुलाशी संपर्क करून त्यांना बोलावून घेतले. तसेच जीवाचे बरे वाईट करण्याच्या उद्देशाने आलेल्या दीनदयाल यांचे मन परिवर्तन केले. यानंतर दीनदयाल यांना त्यांचा मुलगा त्रिकुटजी भानुशली यांच्या ताब्यात दिले. यामुळे त्रिकुटजी यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.
हेही वाचा - उत्तर प्रदेशमध्ये दलित महिला सरपंचाला शिवीगाळ, खुर्चीवरून ओढत बसवलं जमिनीवर