ठाणे : कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या 24 तासात नव्याने 471 रुग्ण आढळून आल्याने महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या 10 हजार 351वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 158 जणांचा मृत्यू झाला असून 4 हजार 946 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल 5 हजार 247 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहता सर्वाधिक रुग्णांची संख्या डोंबिवली पूर्व परिसरात 146 रुग्ण, कल्याण पूर्वेत 96, कल्याण पश्चिममध्ये 132, डोंबिवली पश्चिमेत 60, टिटवाळा-मांडा परिसरात 9, मोहने गावात 24 आणि पिसवली येथे 4 असे एकूण 471 रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांच्या संख्येत 27 दिवसात झपाट्याने वाढ झाल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 12 जून ते 19 जून या आठ दिवसाच्या कालावधीत 1 हजार 315 रुग्णांची वाढ, तर 20 जून ते 27 जूनपर्यंत या दिवसात 2 हजार 298 रुग्णांची नोंद, 28 जून ते 5 जुलैपर्यंत या आठ दिवसात तब्बल 3 हजार 777 रुग्णांची वाढ, 6 जुलैला 413, ७ जुलैला 381 रुग्णांची भर तर आज 471 रुग्ण आढळले आहेत. केवळ 27 दिवसातच 8 हजार 655 रुग्ण आढळून आल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
दरम्यान, दिवसागणिक वाढणाऱ्या आकडेवारीमुळे सर्वच रुग्णालय हाऊसफुल झाले असून पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.