ठाणे - घरगुती सिलेंडर गॅसची दरवाढ दिवसेंदिवस वाढत असून मागील नऊ महिन्यात गॅसचे दर 190 रुपयांनी वाढल्याने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा निषेध करत 'नही चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने बरे दिन' अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिवंडी शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी महिलांनी स्पीड पोस्टाने पंतप्रधान मोदी यांना शेणाच्या गोवऱ्याही पाठवल्या.
मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी -
गॅस दरवाढीसह इतरही जीवनआवश्यक वस्तूचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज भिवंडी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी भिवंडीतील सर्वात मोठे दांडेकरवाडी पोस्ट कार्यालयात एकत्र येऊन या पोस्ट कार्यलयातून स्पीडपोस्टद्वारा शेणाच्या गोवऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविल्या आहेत. आता तरी केंद्र सरकारने घरगुती सिलेंडर गॅसचे दर कमी करावेत, अशी मागणी स्वाती कांबळे यांनी केली आहे. या आंदोलनात अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - राजू शेट्टींनी जलसमाधी घेऊ नये, त्यांची आम्हाला गरज आहे - जलसंपदामंत्री जयंत पाटील