ठाणे - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी ठाणेकरांना स्वस्त दरात कांदे आणि बटाटे यांचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी घराबाहेर येऊ नये, यासाठी घरपोच ही सेवा दिली जात आहे.
हेही वाचा- लढा कोरोनाविरुद्धचा : हिमाचल सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार
ठाणे शहरात आतापर्यंत कोरोनाचे 11 रुग्ण सापडले आहेत. सध्या देश कोरोनाच्या तिसर्या टप्प्यात जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. तरीही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पर्याय नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी नाशिक येथील शेतकर्यांकडून कांदा आणि बटाटे यांची खरेदी केली.
तीन किलो बटाटे आणि 2 किलो कांदे यांची एकत्रीत पिशवी थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी बाजारामध्ये कांदा 30 तर बटाटे 40 रुपये दराने विकले जात आहे. तर, राष्ट्रवादीच्या वतीने साधारणपणे 180 रुपयांच्या या वस्तू अवघ्या 100 रुपयांमध्ये घरपोच दिल्या जात आहेत.
मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभाध्यक्ष नितीन पाटील, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारी, रत्नेश दुबे, निलेश कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष दीपक पाटील, युवक ब्लॉक अध्यक्ष रोहत भंडारी, वॉर्ड अध्यक्ष सुमीत गुप्ता, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे आदी पदाधिकार्यांनी कांदे-बटाटे यांच्या पिशव्या विविध सोसायट्यांमध्ये वितरीत केल्या. राष्ट्रवादीच्या या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विविध भागांमधून दूरध्वनीद्वारे कांदे-बटाट्यांची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच मागणी करणाऱ्या प्रत्येक सोसायटी, गृहसंकुल, विभाग यांच्या दारात कांदे-बटाटे पोहचविण्यात येणार आहेत. ज्यांना कांदे-बटाटे हवे असतील त्यांनी +91 93218 08021, 022-25386464, 022-25386565 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही परांजपे यांनी केले आहे.