ठाणे - अॅड. संजीव पुनाळेकर यांना करण्यात आलेली अटक ही निव्वळ धुळफेक असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने 'दणका' देण्याअगोदर आपण काहीतरी करायला हवे, या दृष्टिकोनातून पुनाळेकर यांना अटक करण्यात आली. तसेच ज्या पध्दतीने भोपाळमधून प्रज्ञा ठाकुर या निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि खासदारही झाल्या. त्या पद्धतीने पाच वर्षांनंतर पुनाळेकर देखील पुण्याचे उमेदवार असतील, असे भाकितही आव्हाड यांनी वर्तवले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी मोठी कारवाई करत सनातन संस्थेची बाजू सातत्याने कोर्टात मांडणारे अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी विक्रम भावे या दोघांना मुंबईतून अटक केली. मात्र, या कारवाईवर आमदार आव्हाड यांनी संशय व्यक्त केला आहे.
दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील सर्व पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर उगाच काहीतरी करायचे म्हणून ही अटकेची कारवाई केली, असल्याचे आव्हाड म्हणाले. प्रज्ञा ठाकूर ज्या प्रमाणे खासदार झाल्या त्याप्रमाणे, कदाचित पुनाळेकर देखील खासदार होतील, असे भाकित आव्हाड यांनी वर्तवले.