ठाणे - मीरा भाईंदर शहरात एकमेव पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे. याप्रमाणेच एक रुग्णालय पालिकेच्या आरक्षित भूखंडावर बांधण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. मीरा भाईंदर शहरातील वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य सुविधा अद्ययावत नसून सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे.
शहरात एकमेव शासकीय रुग्णालय असून सध्या तेही अपुरे पडत आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालय मजबुरीने जावे लागत आहे. त्यात खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या लुटमारीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. एक शासकीय रुग्णालय शहरात बांधण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील अनेक आरक्षित भूखंड पडिक आहेत. तसेच कनकिया परिसरात रुग्णालयासाठी जागादेखील राखीव आहे. यासंदर्भात पालिकेने राज्य सरकारकडे आरक्षण क्रमांक ३०२ शासकीय रुग्णालयासाठी मंजूर असून तशा प्रकारांचा प्रस्तावदेखील महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी आपल्या शिष्टमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन रुग्णालयासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे.