ठाणे : जादूटोणा विरोधी कायदा करुनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जादूटोणाचे समर्थन करत असतील, तर पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दुर्दैवी आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार ( NCP Complaint against Chandrasekhar Bawankule ) केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
काय आहे वाद - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर शरद पवारसाहेब यांनी जादूटोणा केला असल्याचे वक्तव्य केले होते. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडी सरकारने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ साली अंमलात आणला. त्याच कायद्याचे समर्थन भाजपने, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांनी केले होते. मात्र ज्या कायद्याला भाजपच्या नेत्यांनी समर्थन दिले त्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष जादूटोणाबाबत बोलून जादूटोणाचे समर्थन करत आहेत, याबाबत महेश तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बावनकुळेंविरोधात तक्रार दाखल - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाणे, कल्याण येथे तक्रार दाखल केली असून कायदा त्याचं काम करेल असेही महेश तपासे म्हणाले.
