ठाणे: जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त NCC प्रशिक्षण देण्यात येते. या दरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षा देण्यात येते. मात्र, ही शिक्षा अत्यंत अमानवी प्रकारची असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी बाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणत आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये. हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितले आहे.
चांगले कामही विसरले जाणार: एनसीसीचे जे हेड असतात ते कोणी शिक्षक नसून ते सिनियर विद्यार्थीच असतात; मात्र हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार झाला असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या या कृतीने एनसीसी मार्फत केलेली चांगली कामे झाकोळली जातात, हे त्यांनी मान्य केले. झालेला प्रकार निंदनीय असून त्या विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊ नयेत म्हणून एका कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत आहोत. ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी न घाबरता आम्हाला येऊन भेटावे व एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करू नये, असेही नाईक यांनी सांगितले आहे.
एनसीसीमध्ये शिक्षा भयंकर: सैन्यामध्ये ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिली जाते त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असते. चूक झाल्यावर सैन्यात दिली जाणारी शिक्षा ही त्याच पद्धतीने दिली जाते. यात काहीवेळा जाणून बुजून मोठ्या प्रमाणात राग ठेवूनही शिक्षा करत असल्याचे आरोप काही विद्यार्थी करत आहेत. जर असे प्रकार रोखायचे असतील तर त्यावर महाविद्यालयाचे शासकीय नियंत्रण असणे गरजेचे आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे मोठे कार्य: ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचे शिक्षण क्षेत्रात मोठे काम करते. बेडेकर शाळा एके जोशी शाळा लॉ कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज व्यवस्थापन कॉलेज अशा विविध पद्धतीने विद्या प्रसारक मंडळाकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात येते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख हा उंचावर असलेले ठाण्यातील नामांकित महाविद्यालय आहे.