ठाणे - नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या 'ड्रंक अँड ड्राईव्ह' मोहिमेअंतर्गत तब्बल 385 तळीराम वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून दोषी वाहन चालकांचा परवाना जप्त करण्यात आला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या नागरिकांच्या आनंदात विरजण पडू नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुधवारी सकाळपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही कारवाई सुरू होती. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मद्यपींवर आधीपासूनच कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली होती. दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्या 385 तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांची नशा उतरवली आहे. पकडले गेलेल्या मद्यपींचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री वाहतूक शाखेचा मोठा फौजफाटा कारवाईसाठी रस्त्यावर उतरला होता. नवी मुंबईत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत अनेक ठिकाणी फिरते पथक नेमले होते. शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांत वाहनांची तपासणी सुरू होती. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी ३८५ तळीरामांवर कारवाई केली असून मागील वर्षी हा आकडा ३५३ इतका होता
वाहतूक शाखानिहाय कारवाईचा आकडा :
वाहतूक शाखा | कारवाईचा आकडा |
वाशी | ३० |
एपीएमसी | ३८ |
कोपरखैरणे | ३८ |
रबाळे | १४ |
महापे | १६ |
तुर्भे | २३ |
सिवूड्स | ८ |
सीबीडी बेलापूर | १९ |
खारघर | २५ |
तळोजा | २८ |
कळंबोली | ४१ |
पनवेल | २१ |
पनवेल तालुका | १७ |
उरण | ७ |
न्हावा-शेवा | ५ |
गव्हाणफाटा | १० |
उर्वरित | ४५ |
इतक्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.