नवी मुंबई - देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय आणि अस्थापना बंद ठेवण्यात आले. आता देशभरात हळूहळू अनलॉकला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र, राज्य शासनाने यासंदर्भात अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. यामुळे जिम मालक व ट्रेनर हवालदिल झाले आहेत.
मागील चार महिन्यांपेक्षा जास्त काळापासून जिम बंद असल्याने ट्रेनर्सचे पगार आणि जिमच्या भाड्याने जिम मालक त्रासले आहेत. कोट्यवधींचे कर्ज काढून जिम उभारणाऱ्या जिम मालकांवर कोरोनाच्या काळात कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे. यामुळे शासनाने जिम सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करावी, अशी मागणी जिम मालक व ट्रेनर करत आहेत. ट्रेनर मनीष आडविलकर आणि इंटरनॅशनल बॉडीबिल्डर समीर दाबीलकर यांनी सरकारच्या अद्याप जिम बंद ठेवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मॉल, सलून, रेल्वे वाहतूक आणि इतर व्यवसायांना परवानगी दिली. नेहमीसारखे भाजी बाजारही भरत आहेत त्यामुळे जिमला सुद्धा परवानगी देण्यात यावी, अशी मागणी बॉडीबिल्डर करत आहेत.