नवी मुंबई - महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. नेते मंडळी विनापरवाना कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्यामुळे, नागरिकांची प्रचंड गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. कोणताही राजकिय नेता असे कार्यक्रम आयोजित करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी नवी मुंबई मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळदी-कुंकू, पैठणीचे खेळ, खेळ मांडीयेला अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सर्व खाजगी आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरी देखील इच्छुक उमेदवार कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. अशा आयोजकांवर आता महापालिका गुन्हे दाखल करणार असल्याचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. शहरात 3 रुग्ण कोरोनाचे आढळले असून, त्यातील एक फिलपिन्स देशाचा रहिवासी आहे. त्याच्या संपर्कातील आणखी 2 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून हे तिघेही नवी मुंबईतील रहिवासी नाहीत. तसेच, 52 संशयीत रुग्णांवर होम क्वारोंटाइन (देखरेखीखाली करण्यात आले आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.