ठाणे - ओली पार्टी सुरू असताना ग्लासात कच्ची दारु प्यायला दिल्याच्या वादातून मित्राची धारदार हत्याराने वार करून निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार डोंबिवलीच्या सोनार पाडा परिसरातील एका मोकळ्या मैदानात घडला.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. निलेश बाळाराम पाटील (वय 32) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. तर किशोर अभिमन्यू पाटील (वय 32) असे ताब्यात घेतलेल्या संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपी किशोर आणि त्याच गावात राहणारा मृत मिलिंद हे दोघे मित्र सोनारपाड्यातील एका मोकळ्या मैदानात दारू पित बसले होते. मृत निलेश याने किशोर याला पाणी न टाकता त्याच्या ग्लासात कच्ची दारु प्यायला दिली. त्यावेळी दारूत पाणी का टाकले नाहीस? असा जाब किशोरने विचारला असता, यावरून दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. हाणामारीनंतर वाद विकोपाला गेल्यावर किशोर याने सोबत आणलेल्या धारदार हत्याराने निलेशवर वार केले. हत्याराचे वार जिव्हारी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निलेशचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून हल्लेखोर किशोर याने तेथून पळ काढला.
दरम्यान, पहाटे उजाडल्यानंतर निलेशचा मृतदेह आढळून आल्यावर परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. दुसरीकडे पोलिसांनी तपास चक्राला वेग देऊन फरार झालेला किशोर पाटील याला शोधून काढले. त्याने पोलीस चौकशीत निलेशच्या हत्येची कबुली दिली असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे आणि त्यांचे पथक अधिक तपास करीत आहेत.