ठाणे - लॉकडाऊनमुळे वाईनशॉप, बियर बार बंद असल्याने तळीरामांनी गावठी दारूकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गावठी दारूला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने संचारबंदीचा फायदा घेत, काही दारूमाफियांनी मुरबाडच्या जंगलात गावठी दारू गाळण्याच्या हातभट्ट्या सुरू केल्या होत्या. मात्र मुरबाड पोलिसांच्या पथकाने धाड टाकून चारही गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त करत सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
मुरबाड तालुक्यातील कोरावले गावाच्या जंगलात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू केल्या होत्या. या भट्टीवरील गावठी दारू परिसरात विक्री होत असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मुरबाड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विकास निकम व त्यांच्या पोलीस पथकाने कोरावले गावच्या जंगलातील चार ठिकाणी असलेल्या हातभट्ट्यानांचा शोध घेऊन आज दुपारच्या सुमाराला उद्ध्वस्त करून टाकल्या.
त्या ठिकाणी गावठी दारू बनवण्यासाठी असलेला सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात अज्ञात दारू माफियांविरोध गुन्हा दाखल केला असून या गावठी दारूच्या हातभट्ट्या कोण्याच्या आहेत. याचा तपास मुरबाड पोलिसांनी सुरू केला आहे.