नवी मुंबई (ठाणे) - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव कंटेनरने पुढे जाणार्या 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. यामध्ये नवी मुंबईत राहणारे तसेच, नवी मुंबई महापालिकेत कार्यरत डॉ. वैभव झुंजारे यांचा त्यांच्या कुटुंबातील 3 सदस्यांसह मृत्यू झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे कंटेनर जात होता. मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळ कंटेनरने पुढील वाहनांना एकामागोमाग धडक दिली. क्रेटा, इनोवा, ट्रेलर, ट्रक आणि अन्य अशा एकूण पाच वाहनांचा अपघात झाला आहे.
या अपघातात मंजू प्रकाश नाहर (वय 58, रा. गोरेगाव मुंबई), डॉ. वैभव वसंत झुंझारे (वय 41), उषा वसंत झुंझारे (वय 63), वैशाली वैभव झुंझारे (वय 38), श्रिया वैभव झुंझारे (वय 5) यांचा मृत्यू झाला आहे. तर, अर्णव वैभव झुंझारे (वय 11) हा बचावला आहे. त्याच्यावर कळंबोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावाहून घरी येत असताना झाला अपघात
डॉ. वैभव झुंजारे हे नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी होते. ते त्यांच्या खासगी कारने नवी मुंबईकडे येत होते. कोरोना काळात त्यांच्यावरही कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने त्यांनी खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडील, पत्नी व मुलांना सोलापूर येथील गावी ठेवले होते. सोमवारी रात्री या सर्वांना घेऊन ते परत येत असताना हा अपघात घडला. अपघातात डॉ. झुंजारे स्वत: त्यांची पत्नी, आई आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे नवी मुंबई परिसरात शोककळा पसरली आहे.