ठाणे - मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्ग काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे. तर कसारा घाटात काही ठिकाणी झाडे, दरडीसह मातीचे ढिगारे रस्त्यावर कोसळले. परिणामी मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक तुरळक ठप्प झाली आहे.
मुंबई, ठाणेसह सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त असताना काल रात्री पासून शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रासह परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने जोर पकडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची शेती कामे जोरात सुरू झाली आहेत. मात्र, या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्ग विस्कळीत होत असल्याचे दिसून आले. मुंबईहून नाशिककडे जाताना भिवंडी ते गोंदे (इगतपुरी ) या दरम्यान महामार्गवर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे व काही ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे मुंबई नाशिक व नाशिक मुंबई या दोन्ही लेन वर वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. तर कसारा घाटात ठीक ठिकाणी दरडी, माती, झाडें उन्मळून पडल्याने प्रवाशाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
कसारा घाटातील दोन्ही लेन या धोकादायक स्तिथीत असल्यामुळे घाटातून प्रवास करणे प्रवाश्याना जिकरिचे ठरत आहे. दरम्यान कसारा घाटासह महामार्गावरील दुरावस्थेकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत असून महामार्ग वरील रस्ते दुरुस्ती, कसारा घाटातील दरडी वर उपाययोजना करण्यास दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी भरमसाठ टोल भरून देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोकयावर टांगती तलवार ठेऊन प्रवास करावा लागत आहे.